स्वाधारची पूर्वपिठिका

मृणाल ताई गोरे यांची वैचारिक जडण घडण राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत झाली. लोकशाही, समाजवाद या विचारांवर त्याची दृढ निष्ठा होती. त्या एक अत्यन्त झुन्जार, लढाऊ, निर्भीड नेत्या होत्या. त्यांच्या सामाजिक, राजकीय कामचा केंद्रबिंदू हा समाजातील तळागाळातील वंचित समूह हा होता. त्यात स्त्रिया अग्रभागी होत्या. त्यांच्या कामाची सुरूवात त्यांनी गोरेगाव महिला मंडळ स्थापन करून सुरु केली, कुटुंब नियोजन ह्या विषयाला प्राधान्य देत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. स्त्रियांवरील अपत्यांचा भार कमी झाला तर त्यांचे आरोग्य सुधारेल, त्यास्वत:साठी काही वेळ देऊ शकतील. स्वतःचा अवकाश शोधू शकतील, स्वतःमधील कलागुण जोपासू शकतील हा ठोस विचार त्यामागे होता.

त्यांच्याकडे महाराष्ट्रातून अनेक स्त्रियांची आपल्या कौटुंबिक वेदना, व्यथा व्यक्त करणारी पत्रे येत असत, त्या प्रत्येक पत्राला समाधानकारक उत्तर मृणालताई देत असत.वेळप्रसंगी तेथील स्थानिक पोलीस खात्याला पत्र पाठवून समस्याग्रस्त स्त्रीला सहकार्याचा हात मिळवून दिला, हा पत्रव्यव्हार खूप वाढत गेला. आपण करतो हे अपुरे आहे याची त्यांना जाणीव होती. प्रत्येक समस्या पोलिसांकडे घेऊन जाण्यासारख्या नसतात, प्रत्येक समस्येसाठी कायदेशीर कारवाईही आवश्यक नसते. अनेकदा संवादाने प्रश्न सुटू शकतात असे त्यांच्या लक्षात येत होते. काय करता येऊ शकेल? काय आणि कसं करावं? हे विचार त्यांच्या मनात वारंवार डोकावत असत.

याच दरम्यान मीनाक्षी ताई आपटे या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापिका त्यांच्या कडे मुबईतील उच्च शिक्षित, टीव्ही स्त्री कलाकार सोबत वसतिगृहा बाहेर एक डॉक्टर व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे अशी तक्रार घेऊन आल्या होत्या. मीनाक्षीताई त्या स्त्रीला घेऊन मृणालताईंच्या घरी आल्या. या तक्रारीसाठी पोलीस कमिशनर यांची भेट घेण्यासाठी त्या दोघीजणी तिची तक्रार त्यावेळचे पोलीस कमिशनर रिबेलो यांच्या कडे घेऊन गेल्या होत्या. कमिशनर साहेबानी योग्य सहकार्य दिले. अशा प्रसंगात स्त्री संस्थेची आवश्यकता रिबेलोसाहेबांनी अधोरेखित केली.

कौटुंबिक कलहातून कुटुंब न दुरावता स्त्रीचा आत्मसन्मान राखला जाईल या साठी तिलाच स्वतःमध्ये आत्मविश्स्वास निर्माण करावा लागेल, तिनेच आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, स्वावलंबी व्हायला व्हावे, या साठी संस्थात्मक कामाची आवश्यकता जाणवत होती.

मृणालताई या राजकीय, सामाजिक कार्यातील रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या, विधिमंडळात आवाज उठवणाऱ्या नेत्या, तर मीनाक्षीताई या अकॅडेमिक, प्राध्यापिका. दोघीनांही स्त्रियांना आपले दुःख, व्यथा मोकळेपणाने मांडण्यासाठी विश्वासार्ह जागा असावी, स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे असे वाटत होते. स्वतःसाठी तिला एक अवकाश ( स्पेस ) असावा असे वाटत होते.

लोकशाही, समाजवाद, समता,बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, या भारताच्या संविधानातील मूल्यांवर निष्ठा ठेऊन काम करणारी स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या नानाविध प्रश्नांवर, स्त्रियांसोबत काम करणारी संस्था स्थापन करावी हा ठाम विचार मृणाल ताईंचा होता

मृणालताईंनी आपल्या समवेत काम करणाऱ्या ललिता भावे,लता कारखानीस,तर मीनाक्षीताई आपटे यांच्या सहकारी जानकी अंधारिया, अंजली दवे, सनोबर शेखर, एल राजाराम यांच्या सहयोगाने स्त्रियांसोबत काम करणारी, स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वाधार या संस्थेची १९८३ फेब्रुवारी मध्ये स्थापना केली. जानकी अंधारिया, अंजली दवे, सनोबर शेखर, एल राजाराम या कामाच्या ओघात हळूहळू कमी होत गेल्या; परंतु ललिता भावे,लता कारखानीस या आजही स्वाधारच्या कामात व्यस्त आहेत.

स्वाधार नाव कां दिले ?

कौटुंबिक सल्ला म्हणजे केवळ काहीतरी तडजोड करून पतीपत्नीने आणि कुटुंबीयांनी एका घरात राहणे असा सीमित अर्थ स्वाधारच्या स्थापनेमागे नव्हता. तर स्त्रियांना आत्मसन्मान राखून स्वावलंबी,सक्षम जीवन जगण्यासाठी उभारी देणे आणि मदत करणे हा स्वाधारचा मुख्य आणि मुलभूत उद्देश आहे. स्त्रियांनी स्वत:च स्वत;चा आधार बनावे आणि जिद्दीने ठामपणे उभे राहावे यासाठी झटणारी संस्था म्हणजे स्वाधार.

स्वाधारचे उद्दिष्ट :-

स्वाधार ही महिलांच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. विशेषत: समस्याग्रस्त महिलांना त्याची समस्या सोडविण्यासाठी आणि सन्मानाने उभे राहण्यासाठी मदत करणे हे स्वाधारचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच बरोबर समाजात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे, समाजात स्त्रीपुरुष समानता रुजावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे स्वाधारचे उद्दिष्ट आहे.

स्वाधारची ध्येय धोरणे :-

  1. शारीरिक, मानसिक त्रासाने पिडीत महिलांना मदत करणे
  2. स्त्रियांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक मदत करणे, कौटुंबिक सल्ला देणे आणि जरूर असेल त्याप्रमाणे कायदेशीर सल्ला देणे व कायदेशीर कारवाईसाठी मदत करणे कौटुंबिक अत्याचाराला व हिंसेला बळी पडलेल्या स्त्रियांना आधार व संरक्षण देणे.
  3. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल समाजात जाणीव जागृती निर्माण करणे.
  4. महिलांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे तसेच समाजातील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून त्यांना व आत्मनिर्भर करणे. या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याशी सहकार्य करून त्यांची मदत घेऊन या कामाची व्याप्ती वाढविणे.

या ध्येय धोरणांनुसार काम करून उद्दिष्टाप्रत पोहोचण्याचे स्वाधारचे मार्ग

स्वाधारकडे येणाऱ्या समस्याग्रस्त महिलांच्या सोयीसाठी आणि स्वाधारच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी मुंबईत चेंबूर मुलुंड व चुनाभट्टी येथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने स्वाधारच्या शाखा कार्यरत आहेत. पुणे येथे स्वाधारचे स्वतंत्र केंद्र आहे.