१० जानेवारी १९१७ पासून चुनाभट्टी येथे तेथील कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने स्वाधारची शाखा सुरु झाली. या शाखेत समुपदेशन केले जाते, प्रबोधनात्मक कार्यक्रम, महिला मेळावे आयोजित केले जातात. तसेच गरजू मुलींना शालेय शिक्षणासाठी मदत करणारा ‘शैक्षणिक प्रकल्प स्वाधार’ हा उपक्रमही राबविला जातो. या उपक्रमातील लाभार्थी मुलींची निवड निकषांचे काटेकोरपणे पालन करून केली जाते. परिसरातील शाळांकडून गरजू मुलींची माहिती घेऊन त्या मुलींच्या घरी कार्यकर्ते भेट देतात, त्याच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीची पाहणी करतात. त्यानंतरच या मुलींची उपक्रमातील लाभार्थी म्हणून निवड केली जाते.या उपक्रमात समाजातील संवेदनशील व्यक्ती दरवर्षी एका मुलीच्या शैक्षणिक मदतीसाठी रु. २५००/- देणगी देतात. काही व्यक्ती आणि संस्था शैक्षणिक साहित्य वस्तूरूप देणगी देतात. आम्ही ही मदत शैक्षणिक साहित्य, फी, गणवेश, वह्या इ. रूपाने लाभार्थी मुलींपर्यंत पोहचवतो. या मुलींना शालेय अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. देणगीदारांच्या मदतीने मुलींना उच्च शिक्षणासाठीही मदत करतो. या मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने दरवर्षी या विद्यार्थिनींसाठी शिबिरे व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी  विद्यार्थ्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.