दत्तकपालक उपक्रम
स्त्रियांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मदतीचा हात देणे हे स्वाधारचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्त्रियांनी विचाराने सक्षम आणि आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनणे गरजेचेआहे. याचा पाया मुलींच्या शालेय जीवनातच घातला जातो. वस्तुत: शिक्षण हा प्रत्येक मुलामुलीचा अधिकार आहे. परंतु अनेक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते त्यातही मुलींच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे. या गळतीचे मुख्य कारण आर्थिक दुर्बलता हे आहे. या मुलं मुलींना शिक्षणासाठी मदतीचा हात द्यावा या दृष्टीने स्वाधारचे केंद्र व सर्व शाखा काही शैक्षणिक उपक्रम राबवितात. हे सर्व उपक्रम पूर्णत: लोकसहभागातून राबविले जातात.
आर्थिकदृष्टया अतिदुर्बल गटातील या मुलींवर शाळा सोडण्याची वेळ येऊ नये. त्यांचे किमान शालेय शिक्षण तरीपूर्ण व्हावे या हेतूने टाकलेले एक पाऊल म्हणजे दत्तक पालक उपक्रम.
या उपक्रमातील लाभार्थी मुलींची निवड निकषांचे काटेकोरपणे पालन करून केली जाते. परिसरातील शाळांकडून गरजू मुलींची माहिती घेऊन त्या मुलींच्या घरी कार्यकर्ते भेट देतात, त्याच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीची पाहणी करतात. त्यानंतरच या मुलींची उपक्रमातील लाभार्थी म्हणून निवड केली जाते.
या उपक्रमात समाजातील संवेदनशील व्यक्ती दरवर्षी एका मुलीच्या शैक्षणिक मदतीसाठी रु. २५००/- देणगी देतात. काही व्यक्ती आणि संस्था शैक्षणिक साहित्य वस्तूरूप देणगी देतात. आम्ही ही मदत शैक्षणिक साहित्य, फी, गणवेश, वह्या इ. रूपाने लाभार्थी मुलींपर्यंत पोहचवतो. या मुलींना शालेय अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. देणगीदारांच्या मदतीने मुलींना उच्च शिक्षणासाठीही मदत करतो. या मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने दरवर्षी या विद्यार्थिनींसाठी शिबिरे व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करतो.यासाठी विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्कआकारले जात नाही.
स्वाधारचे गोरेगाव केंद्र २००७ पासून हा उपक्रम दत्तक पालक योजना या नावाने, चेंबूर शाखा १९९५ पासून हा उपक्रम ‘शैक्षणिक प्रकल्प’ या नावाने आणि चुनाभट्टी शाखा २०१७ पासून ‘शैक्षणिक प्रकल्प स्वाधार’ या नावाने हा उपक्रम राबवित होती. २०१९ पासून केंद्र व सर्व शाखा हा उपक्रम ‘दत्तक पालक उपक्रम’ या नावाने राबवितात.
आजतागायत —— विद्यार्थिनींनी या उपक्रामाचा लाभ घेऊन शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यातील —– % मुलींनी महाविद्यालयीन शिक्षणही घेतले.
बालरंग
स्वाधारकडे येणाऱ्या समस्याग्रस्त महिलांपैकी बहुतांश महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात. त्यांचे पती मुलांच्या शिक्षणासाठी कोणताही सहभाग देत नाहीत. अशा परीस्थित त्यांना मुलांचे शिक्षण पूर्ण करणे अवघड होऊन जाते. या मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वाधारच्या गोरेगाव केंद्राने बालरंग उपक्रम सुरु केला. या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली जाते शालेय अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शिबिरे व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. यासाठी विद्यार्थ्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आज पर्यंत —– मुलामुलींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
“शिक्षण सहाय्य” उपक्रम
स्वाधार दत्तक पालक उपक्रमातील विद्यार्थिनी, बालरंग उपक्रमातील विद्यार्थीविद्यार्थिनींना शालान्त परिक्षेनंतर त्यांच्या क्षमतेनुसार महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. आज पर्यंत —– मुलामुलींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. यापैकी काही मुले CA, डॉक्टर, इंजिनिअर ही झाली आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी
स्वाधारची मुलुंड शाखा मुख्यत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी, वाकस (नेरूळ) येथील डॉ दत्ता सामंत विद्यालय आणि माणगाववाडी येथील मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेत मुलुंड शाखेचे कार्यकर्ते विविध शैक्षणिक आणि मुलांचे विचार विकसित होण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबवितात. नेरळ जवळील लव्हाळवाडी येथील आदिवासी पाडयात स्वाधारच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक शाळा सुरु केली. एका घरात सुरु झालेल्या या शाळेला आज जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे व शाळेला इमारतही बांधून दिली आहे.