१९९५ साली श्रीमती इंदुताई खानोलकर यांच्या पुढाकाराने तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चेंबूर येथे स्वाधारची पहिली शाखा सुरु झाली. शाखे तर्फे स्वाधारच्या ध्येयधोरणानुसार कुटुंब सल्ला केंद्र व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे. हे लक्षात घेऊन या मुलींचे किमान शालेय शिक्षण पूर्ण व्हावे या विचाराने १९९५ साली या शाखेने ‘शैक्षणिक प्रकल्प’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमात सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या लोकांकडून देणगी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. प्रत्येक देणगीदाराकडून एका मुलीसाठी एका वर्षासाठी देणगी घेऊन त्यातून मुलीला शैक्षणिक साहित्य पुरवायचे अशा स्वरुपात हा प्रकल्प आहे. या उपक्रमात इ. ५ वी ते १० वी च्या मुलींना मदत दिली जाते. या उपक्रमातील लाभार्थी मुलींची निवड निकषांचे काटेकोरपणे पालन करून केली जाते. परिसरातील शाळांकडून गरजू मुलींची माहिती घेऊन त्या मुलींच्या घरी कार्यकर्ते भेट देतात, त्याच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीची पाहणी करतात. त्यानंतरच या मुलींची उपक्रमातील लाभार्थी म्हणून निवड केली जाते. लोकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतीसाद मिळाला. ५ मुलींपासून सुरु झालेल्या या उपक्रमाचा आजवर १५०० पेक्षा अधिक मुलींना लाभ मिलालाअहे. प्रकल्पातील मुलींसाठी दरवर्षी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात मुलींसाठी प्रबोधनात्मक शिबिरे, विविध स्पर्धा, सहली आयोजित केल्या जातात. इंग्रजी भाषेचा वर्ग चालविला जातो. हे सर्व विनामुल्य चालविले जाते.

२०१९ पासून हा उपक्रम ‘दत्तक पालक उपक्रम’ या नावाने चालू आहे.