२० एप्रिल, १९९१ रोजी मुलुंड, मुंबई येथे स्वाधारची शाखा सुरु झाली. मा. मृणालताई गोरे, मीनाक्षीताई आपटे, इंदुताई खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती प्रभा देशमुख व सरोज रणदिवे यांनी मुलुंडला शाखा सुरु केली. स्वाधारच्या ध्येय धोरणानुसार समस्याग्रस्त महिलांना सहाय्य आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम उपक्रम करते. मुलुंड शाखा विशेषत्वाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम व जीवन शिक्षणाचे कार्यक्रम करते. नेरळ जवळील लव्हाळवाडी येथील आदिवासी पाडयात स्वाधारच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक शाळा सुरु केली. एका घरात सुरु झालेल्या या शाळेला आज जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे व शाळेला इमारतही बांधून दिली आहे. स्वाधारच्या कार्यकर्त्या या परिसरातील मुलांशी व पालकांशी सातत्याने संवाद साधून त्यांना शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देतात. माणगाववाडी येथील मधुरम चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालित आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत आणि वाकस, नेरळ येथील दत्ता सामंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात जीवन शिक्षण, वयात येताना, अंधश्रध्दांविरुध्द जागृती हे कार्यक्रम विशेष करून आयोजित केले जातात. मुलांना समाजातील स्फूर्तीदायी व्यक्तींच्या मुलाखती, ध्वनी चित्रफिती दाखवून मुलांमध्ये काही बनण्याची जिद्द निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. मुलुंड परिसरात वस्ती पातळीवर व आराधना महिला मंडळाच्या सहकार्याने विविध प्रबोधनात्मक व्याख्याने व कार्यशाळा, कायदासाक्षरता शिबीरे सातत्याने आयोजित केली जातात. शाखा महिला व मुलींच्या वसतीगृहात व आश्रमात महिलांसाठी व मुलींसाठी जीवनशिक्षण, लैंगिक शिक्षणाचे कार्यक्रम घेते. मुलुंड पूर्व येथील वाल्मिकी नगर या सफाई कामगारांच्या वस्तीतील २००३ ते २०१० या काळात सतत ७ वर्षे सतत प्रबोधनाचे कार्यक्रम राबविले. या महिला अशिक्षित असल्यामुळे गाणी, गोष्टींच्या माध्यमांतून त्यांना स्वच्छतेचे, आरोग्याचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. लहान मुले, विशेष मुले व ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचा सांभाळ सजगतेने करावा लागतो. हे ओळखून याबाबत जाणीव जागृती करणारे मुलुंड शाखेने सातत्याने आयोजित केले. सामाजिक भान, सामाजिक, वैयक्तिक आरोग्य, अंधश्रद्धा कायदा या बाबतीत प्रबोधन करणारी व्याख्याने आयोजित केली.
उदाहरणार्थ —
१) “स्त्रिया व मुले यांच्या साहाय्यार्थ खास कक्ष” | अनिता गेही व तृप्ती पांचाळ |
२) “कुटुंब नियोजन व वाढती लोकसंख्या” | श्रीमती आशर |
३) “आयोडिनयुक्त मीठाचा प्रचार, वस्तुस्थिती | प्रा. रविंद्र रु. पं.व थायराॅईड समस्या |
४) दारूचे शरीरावर व मनावर होणारे परिणाम | डॉ. रुपेश धुरी |
५) दारूचे कुटुंबावर व समाजावर होणारे परिणाम | डॉ. सुरेज मेहता |
६) “मद्यपान” | हेमा शहा, डॉ. आनंद नाडकर्णी, |
७) “वैश्यांचे पुनर्वसन” | श्रीमती प्रीती शहा |
८) “गणेशोत्सव कसा साजरा करावा?” | रेखा ठाकूर, प्रभा देशमुख |
९) ‘महिला संघटनांचे महत्त्व’ | गीता पंडित व देशमुख |
१०) कौटुंबिक आरोग्य – सामाजिक व शारीरिक | शारदाबेन आशर |
११) ‘स्त्रिया व अत्याचार’ | श्रीमती वीणा दास |
१२) ‘मानसिक समस्येमुळे निर्माण होणारे ताणतणाव’ | डॉ. अनुराधा सोवनी |
१३) राष्ट्रीय महिला कोष व त्याचे महिलांना होणारे फायदे | श्रीमती प्रेमा पुरव |