स्वाधारने पूर्वी राबविलेले काही विशेष उपक्रम
बालवाडी / पाळणाघर शिक्षिका प्रशिक्षण वर्ग –
स्वाधार संस्थेत आपली समस्या घेऊन येणा-या बहुतांश स्त्रिया अल्पशिक्षित व परावलंबी असतात.त्याच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारामुळे त्या स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसलेल्या असतात. त्यांची निर्णय क्षमता कमी झालेली असते. अशा स्त्रियांमधे आत्मविश्वास निर्माण व्हावा,त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाता यावे या उद्देशाने १९८८ पासून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापिठाच्या सहकार्याने “स्वाधार/बालवाडी पाळणाघर शिक्षिका प्रशिक्षण वर्ग” हा उपक्रम १७ वर्ष राबविला गेला. प्रशिक्षण वर्ग १९८८ ते २००५ पर्यंत राबविला गेला.
विद्या आगाशे, शोभना दाबके, प्रतिभा पराडकर, सुलभा जोशी, प्रभा जोशी, सुषमा शिर्के, वृषाली डंबल यांचा ह्या प्रशिक्षण वर्गाचे कामकाज पुढे नेण्यातील योगदान महत्वाचे होते. या सर्वांनी ह्या प्रशिक्षण वर्गाचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले होते.सुनंदा हवाळे, रेखा सामंत,हेमा बावकर, वृंदा खोपकर, डॉ.जयंती देशपांडे, मंगला विचारे, नयना बर्वे, सविता सामंत, विद्या कांबळे या शिक्षिकांचे सहकार्य त्यांना लाभले.
एकूण ७०० विद्यार्थींनींनी ह्या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतला. १९९८ ते २००६ पर्यंत ८वी पास झालेल्या विद्यार्थींनींनीसाठी बालविकास प्रशिक्षण शिक्षिका वर्ग चालू होता. त्यातील बहुतेक विद्यार्थींनी आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. काही विद्यार्थींनींनी स्वत:ची पाळणाघरे व बालवाडया चालू केल्या.
सावली वसतिगृह –
मुंबईत नोकरीनिमित्त येणाया अल्प उत्पन्न गटातील महिलांना सुरक्षित निवारा मिळावा या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळाने गृहनिर्माण मंडळा मार्फत महिलांसाठी वसतिगृह योजना सुरू करण्याचे ठरवले.स्वाधारला असे वसतिगृह चालवण्याची संधी मिळाली. १९९० ते १९९३ या काळात स्वाधारने यशस्वीपणे वसतीगृह चालविले. स्वाधारच्या मीनाक्षी आपटे, लता कारखानीस, वसुधा नेने,शमा दलवाई, शैला सातपुते यांची समिती या वसतिगृहाचे कामकाज नीट चालावे म्हणून कार्यरत होती.
जागर मानवतेचा
स्वाधारच्या संस्थापक अध्यक्ष मा. मृणाल गोरे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात स्वाधारने “जागर मानवतेचा” ह्या अभियानांतर्गत कोकण,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,विदर्भ, या महाराष्ट्राच्या भौगोलिक विभागात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, आणि त्या त्या विभागातील समविचारी संस्था,संघटना, महिला मंडळ यांच्या सहयोगाने (महिला हक्क संरक्षण समिती नाशिक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी गडचिरोली,मातृमंदिर देवरूख, श्रमिक महिला संघ वसई, आदिवासी सहज शिक्षण परिवार, श्रमिक महिला आणि प्रेरणा महिला सहकारी पतसंसथा, पालघर)
स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचाराबाबत, आणि समाजात स्त्रीपुरुष समानता रुजावी, स्त्रियांकडे एक माणूस म्हणून बघा हा दृष्टीकोन रुजावा या दृष्टीने समाजात जाणीव जागृती करणारे, महाराष्ट्रात विविध ७५ ठिकाणी ७५ कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध स्तरातील स्त्री पुरुषांशी हा संवाद साधला.स्रियांवरील अत्याचारा च्या विविध मुद्यांवर नागेश हाटकर यांनी अत्यंत बोलकी पोस्टर्स या अभियानासाठी करून दिली होती.स्वाधारच्या सर्व कार्यकर्त्यांचा या अभियानामधे सहभाग होता.
या अभियानाच्या दोन दिवसाच्या सांगता समारंभात, दिंडी, लेझिम, या दिंडीत गोरेगावमधील शाळांचा सहभाग महत्वचा होता. स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत विविध प्रश्नांवर गटचर्चा, पाणी प्रश्नावरचे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, मृणालताईंची प्रकटमुलाखत, स्वाधारच्या वीस वर्षाच्या वाटचालीचा नाट्यरुपात आढावा, पोस्टर्स प्रदर्शन, मृणालताईंच्या जीवन कहाणी सांगणारे रोहिणी गवाणकर लिखित स्पॅरो प्रकाशित पुस्तक ‘पाणीवाली बाई’ या पुस्तकाचे प्रकाशन. अशा भरगच्च कार्यक्रमाने झाली.
या पंचाहत्तरीच्या निमित्ताने स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा मागोवा घेणारे शोध बाई माणसाच्या जिण्याचा हे पुस्तक २००४ मधे प्रकाशित झाले.हा एक उत्कृष्ट दस्तावेज आहे.
कायदे विषयक जाणीव जागृती शिबीर
विधी प्राधिकारण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने स्वाधारला कायदेविषयक जाणीव जागृती शिबीरे घेण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले होते. स्वाधारने मुंबईत 25 ठिकाणी ही शिबीरे घेतली, कायद्याची तोंड ओळख ही पुस्तिका प्रकाशित केली, कायदे विषयक पोस्टर्स तयार केली.
ग्रामीण भागातील कार्यक्रम
मालवण जि. सिंधुदुर्ग येथे ग्रामीण भागात सर्वेक्षण, गावाची निवड, आरोग्य शिबीर, वाचनालय, महिला चेतना शिबीर, कायदे विषयक प्रशिक्षण, सर्वेक्षण पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी. आणि त्यांचे प्रशिक्षण.आदी उपक्रम स्वाधार मार्फत घेतले. त्यासाठी प्रशिक्षण साहित्य तयार केले, गावाचा नकाशा काढणे तो वाचणे, खेळ, गाणी, आदी माध्यमांद्वारे ही शिबीरे घेण्यात आली.डॉ.पी व्ही मंडलिक ट्रस्ट च्या सहकार्याने पंचायत समिती सदस्यांचे शिबीर झाले..
वडघर ता गोरेगाव माणगाव जि.रायगड येथे, सर्वेक्षण, आरोग्य शिबीर,महिला जाणीव जागृती शिबीर घेण्यात आले. लता कारखानीस, ललिता भावे, लता देसाई, सुजाता खानोलकर, संध्या लोहार, रोहिणी कुलकर्णी, वसुधा नेने, माधुरी तेंडुलकर यांचा सहभाग मोलाचा होता.