कौटुंबिक सल्ला केंद्र हे स्वाधारचे मुख्य काम आहे. १९८७ साली या केंद्राला केंद्रिय समाज कल्याण बोर्डाची मान्यता मिळाली आहे. समाजातील सर्व जातीधर्माच्या आणि सर्व स्तरातील महिला आपल्या विविध समस्या– हुंडा, मारहाण, मानसिक छळ, बलात्कार, इत्यादी घेऊन स्त्रिया स्वाधार मध्ये येतात. समस्याग्रस्त महिलेचे लेखी निवेदन घेणे, तिचे आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून घेणे, दोघांची एकत्र बैठक घेणे, दोघांना समुपदेशन करणे, गृहभेट करणे, आवश्यक असेल तिथे दोन्ही बाजूकडील नातेवाईकांबरोबर बैठक घेणे, त्यांनाही समुपदेशन करणे आणि यातून सर्वमान्य आणि सन्मान्य तोडगा सुचविणे जेणेकरून कुटुंबातील अन्याय दूर होईल आणि शक्यतो कुटुंब तुटणार नाही – ही स्वाधारच्या कौटुंबिक सल्ला केंद्राच्या कामाची पध्दत आहे. या कामात काही वेळा वकीलांच्या व पोलिसांच्या मदतीचीही गरज भासते. काहीवेळा वैद्यकीय व मानसोपचाराची गरज भासते. तेव्हा ही मदत स्वाधारकडून उपलब्ध करून दिली जाते. समुपदेशनाचे हे काम पूर्णपणे विनामुल्य केले जाते. आजतागायत सुमारे दहा हजार समस्याग्रस्त स्त्रियांनी व त्यांच्या कुटुंबियांनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे लाभ घेतला आहे. स्वाधारकडे येणाऱ्या समस्या ग्रस्त महिलांच्या सोयीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने १९८८ साली चेंबूर, १९९१ साली मुलुंड , २०१७ मध्ये चुनाभट्टी येथे स्वाधारच्या शाखा सुरु झाल्या. १९९५ मध्ये पुणे येथे स्वाधारचे स्वतंत्र केंद्र सुरु झाले.

स्वाधारकडे येणाऱ्या समस्याग्रस्त महिलांच्या समस्यांचे सर्वसाधारण स्वरूप

१) स्त्रीचा सासरी होणारा शारीरिक / मानसिक छळ
२) नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध / दुसरे लग्न / स्त्रीला नव-याने सोडून दिले
३) नवरा व्यसनी असणे / मनोरुग्ण असणे
४) हुंडाबळी / हुंडयाची मागणी
५) विवाहपूर्व मातृत्व
६) मालमत्तेसंबंधी समस्या
७) कुटुंबियांकडून / अन्य नातगत / अन्य व्यक्तीकडून त्रास होणे
८) मूल न होणे / मुली झाल्या म्हणून
९) स्वभावदोषांमुळे येणारे विसंवाद
१०) आरोग्याविषयी समस्या
११) लैंगिक समस्या
१२) संसारात नातेवाईकांकडून होणारा हस्तक्षेप
१३) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक त्रास

कुटुंबातील अशा समस्या सोडविण्यासाठी आम्ही या स्त्रियांना अशा प्रकारे मदत करतो. 

• समुपदेशनाने सर्व कुटुंबियांना समस्या समजावून सांगून सोयीस्कर मध्यम मार्ग सुचवून समझोता घडवून आणतो. यासाठी गरज पडल्यास मानसोपचारतज्ञ, डॉक्टर, पोलीस व कायद्याची मदतही घेतो.
• समझोता होणे अशक्य असेल तिथे महिलेला कायदेशीर मदत व पोलीस सहाय्य मिळवून देतो.
• महिलेच्या गरजेनुसार काही विशेष सेवा देणाऱ्या संस्थांची मदत मिळवून देतो. उदा. वसतीगृह, तात्पुरता निवारा देणाऱ्या संस्था इ.